पुणे-सातारा महामार्गावरील आणखी एक समस्या; बहुतांश दिवे बंद

आंबेगाव बुद्रुक, (संतोष कचरे)- पुणे-सातारा बाह्यवळण रस्त्याच्या कामातील त्रुटींतून होणारे अपघात तसेच त्यानंतरही उपाय योजनांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असताना या महामार्गावरील बोगद्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न समोर आला आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी बोगद्यातील वीजयंत्रणा डळमळीत झाली असून दिवे बंद आहेत. वाहनांच्या दिव्यातच वाहतूक सुरू असली तरी बहुतांशी वाहनांचे मागील दिवे (टेल लॅम्प) बंद असल्याने यातून अपघातचा धोका अधिक वाढला आहे. याबाबत सजग नागरिक मंचच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आली असता सर्व दिवे सुरू असल्याचा दावा केला गेला तरी प्रत्यक्षात मात्र “अंधार’च आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील बोगद्यातील 80 ते 90 टक्के दिवे बंदच असतात. याबाबत चालकांकडून अनेकदा प्राधिकरणाकडे तक्रारही करण्यात आली आहे. परंतु, प्रत्येक वेळी सर्व दिवे सुरू असल्याचेच सांगण्यात येते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. याचाच अनुभव पुन्हा-पुन्हा वाहन चालकांना येत आहे. सोमवारी (दि.13) या मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालकांनी बोगद्यातील दिवे बंद असल्याची स्थिती प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्य निदर्शनास आणून दिली, त्यानंतर बोगद्यातील दिवे सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मंगळवारी (दि.14) परिस्थिती तशी होती. त्यामुळे अशा “सरकारी’ कामाच्या पद्धतीवर वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. या बोगद्यातील दिवे बंद असल्याची अनेक छायाचित्र बुधवारी (दि.15) सर्वत्र सोशल मीडियावरही अनेक वाहनचालकांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर तरी महामार्ग प्राधिकरणाकडून बोगद्यातील दिवे सुरू करण्याबाबत हालचाली होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सध्या स्थितीततही ही समस्या कायम असून खंबाटकी बोगदा आणि प्राधिकरणाच्या कामात “अंधार’च आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी बोगद्यातील सर्व दिवे सुरू ठेवण्यात आले आहेत. जे काही बंद असतील त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. बोगद्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही उपाय आहेत ते सर्व करण्यात आलेले आहेत. वीज यंत्रणाही अधिक सक्षम असेल, याकडेच आमचे लक्ष असते. जी काही समस्या असेल ती तातडीने सोडविली जाईल.
– सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे




