Maharashtra Politics : फडणवीसांचा आणखी एक मंत्री अडचणीत येणार! ‘या’ माजी आमदाराने केले खळबळजनक आरोप

जळगाव : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला. तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. यादरम्यान महायुती सरकारमधील आणखी एका नेत्यावर विरोधकांनी टीका केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जयकुमार रावल यांच्या अडचणीत वाढ
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये जमीन गेल्याचा बनाव जयकुमार रावल यांनी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. रावल हे सध्या फडणवीस सरकारमध्ये पणन मंत्री आहेत. जमीन बुडीताखाली जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र सरकारलाच मंत्री जयकुमार रावल चुना लावल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. या माध्यमातून रावल यांनी सरकारकडून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला आहे.
कसा केला भ्रष्टाचार?
जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीची शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे भासवले. त्याचे तसे कागदपत्र तयार केले. त्यातून त्यांनी शासनाची फसवणूक केली. धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला. आपल्या राजकीय वजनाचा फायदा घेत तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले.
या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारा विरोधात तक्रार देखील केली आहे. या आरोपानंतर रावल यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या आरोपांबाबत मंत्री जयकुमार रावल यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





