आणखी एक हनीट्रॅप! परराष्ट्र मंत्रालयाचा कर्मचारी ‘त्या’ तरुणीच्या जाळ्यात; तरुणीला गोपनीय फाईल्स केल्या शेअर

नवी दिल्ली : देशात सध्या प्रदीप कुरुलकर यांचे हनीट्रॅप प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. हे प्रकरण अजून ताजेच असताना आता परराष्ट्र मंत्रालयाचा आणखी एका कर्मचारी अशाच ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये या कर्मचाऱ्याने G20 परिषदेशी संबंधित काही गोपनीय फाईल्स एका ऑनलाईन फ्रेंडला पाठवल्याची माहिती उघड झाली आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आऊटसोर्सिंग करून जे कर्मचारी तैनात केले होते, त्यांपैकीच एक हा कर्मचारी आहे. नवीन पाल असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो १२ वी पास आहे. तसेच नवीन एमटीएस पदावर कार्यरत आहे. नवीन हा अज्ञात व्यक्तीला गोपनीय डॉक्युमेंट्स पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. यानंतर तपासात पोलिसांना नवीनकडे एक आयफोन आढळून आला.
या आयफोनमध्ये G20 परिषदेशी संबंधित डॉक्युमेंट्सचे फोटो दिसून आले. या सर्व डॉक्युमेंट्सवर ‘सीक्रेट’ असे लिहिले होते. याव्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्सचे स्क्रीनशॉट देखील मिळाले. हे सर्व फोटो त्याने ‘अंजली कलकत्ता’ नावाने सेव्ह असलेल्या एका नंबरवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर केले होते. पोलिसांनी जेव्हा नवीनची बँक हिस्ट्री तपासली, तेव्हा त्याच्या खात्यावर अज्ञात व्यक्तीने आतापर्यंत ८५ हजार रुपये भरल्याचे दिसून आले. यामुळे, नवीन या गोपनीय फाईल्स विकत असल्याचे स्पष्ट झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीनची सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजली नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी नंबर एक्सचेंज करून व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. अंजलीने आपण कोलकातामध्ये राहत असल्याचे सांगितले होते. अंजली नावाची ही तरुणी कोलकाता नाही, तर पाकिस्तानची रहिवासी असू शकते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, ती आयएसआय एजंट असण्याची शक्यताही असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या नवीनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर तपास यंत्रणा याबाबत अधिक चौकशी करत आहेत.




