Pune News : ..…अन् हिऱ्याची अंगठी सापडली, ग्रामस्थांकडून कामगारांचे कौतुक

वाघोली: केसनंद तालुका हवेली या परिसरात नियमित काम करत असताना कचऱ्यात हरवलेली हिऱ्याची अंगठी शोधण्यासाठी आदर पूनावाला क्लीन सिटीच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण कचरा गाडी खाली केली. कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात हरविलेल्या हिऱ्याची अंगठी शोधून काढली आणि मूळ मालकाला दिली. सफाई कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केसनंद ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच प्रमोद हरगुडे पाटील, सरपंच धनाजी हरगुडे , उपसरपंच भारत हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल हरगुडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला आहे. आदर पूनावाला क्लीन सिटीचे कर्मचारी केसनंद (ता. हवेली) भागात नियमित काम करत असताना त्यांना त्याच गावातील शबाना महमंद शेख या महिलेने त्यांची हिऱ्याची अंगठी गहाळ झाली असल्याचे सांगितले.
गहाळ झालेली अंगठी कचऱ्यात गेलेली आहे अशी महिलेला शंका होती. जेव्हा आदर पूनावालाचे कर्मचारी विवेक सावंत व मनोज जाधव यांना सांगितले तेव्हा त्यांनी त्यांची शंका दूर करण्यासाठी पूर्ण भरलेली गाडी रिकामी करून एक एक कचरा वेगवेगळा करून शोधण्यास सुरुवात केली. बराचवेळ कचऱ्यात शोध घेतल्यानंतर ती हिऱ्याची अंगठी सापडली. अंगठी मिळाल्याने शेख कुटुंब आनंदी झाले. त्यांनी आदर पूनावाला क्लीन सिटीचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी आदर पूनावाला क्लीन सिटीचे सीसीओ मल्हार करवंदे, प्रकल्प मॅनेजर फारूक बांगी, एएसआरचे फील्ड ऑफीसर अँर्डो फ्रँक व सुपरवायझर अविनाश चव्हाण उपस्थित होते.
हिऱ्याची अंगठी शोधून प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण कर्मचाऱ्यांनी निर्माण केले आहे. हाच प्रामाणिकपणा माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून सार्थ अभिमानास पात्र ठरतो.
प्रमोद हरगुडे पाटील, माजी सरपंच, केसनंद




