Rani Mukerji: राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! प्रतिष्ठेच्या मानद डॉक्टरेटने होणार सन्मान
Rani Mukerji राणी मुखर्जीला हा सन्मान दोन महत्त्वाच्या कारणांसाठी दिला जात आहे. पहिले म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील तिचा जवळपास तीन दशकांचा यशस्वी अभिनय प्रवास, आणि दुसरे म्हणजे सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने केलेले तिचे योगदान.

Rani Mukerji: बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान आणि समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठ राणी मुखर्जीला ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (Honorary Doctor of Letters) ही मानद डॉक्टरेट प्रदान करणार आहे. हा सन्मान तिला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2026 दरम्यान दिला जाणार आहे.
हा विशेष सन्मान १४ ऑगस्ट २०२६ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील फेडरेशन स्क्वेअर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात प्रदान केला जाईल. हा कार्यक्रम इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२६ चा एक भाग असणार आहे. यंदाचा हा चित्रपट महोत्सव १३ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.
राणी मुखर्जीला हा सन्मान दोन महत्त्वाच्या कारणांसाठी दिला जात आहे. पहिले म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील तिचा जवळपास तीन दशकांचा यशस्वी अभिनय प्रवास, आणि दुसरे म्हणजे सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने केलेले तिचे योगदान.
राणीने आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या आणि आशयघन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘ब्लॅक’, ‘हिचकी’, ‘मर्दानी’ आणि ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने महिलांचे हक्क, शिक्षण, मानसिक आरोग्य, सामाजिक न्याय आणि महिलांच्या सक्षमीकरणासारखे महत्त्वाचे विषय प्रभावीपणे मांडले. तिच्या अभिनयामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही मोठी पसंती मिळाली.

Rani Mukerji
चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जी विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय आहे. विशेषतः मुलांचे शिक्षण, आरोग्य, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू घटकांना मदत करण्यासाठी ती अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. समाजासाठी केलेल्या या योगदानाचीही या मानद सन्मानासाठी विशेष दखल घेण्यात आली आहे.
या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना राणी मुखर्जी म्हणाली, “ला ट्रोब विद्यापीठाकडून हा सन्मान मिळणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. सिनेमा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक राहिला आहे. मला नेहमी अशा कथा साकारण्याची संधी मिळाली, ज्या धैर्य, आशा आणि सकारात्मक बदलाचा संदेश देतात.”
ती पुढे म्हणाली, “हा सन्मान मी माझी मातृभूमी भारताला आणि जगभरातील माझ्या चाहत्यांना समर्पित करते. त्यांच्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच मी आज या स्थानापर्यंत पोहोचू शकले आहे.”
राणी मुखर्जीला मिळणारा हा मानद डॉक्टरेट सन्मान हा केवळ तिच्या अभिनयाचा गौरव नाही, तर समाजाप्रती असलेल्या तिच्या बांधिलकीचीही पोचपावती आहे. भारतीय अभिनेत्री म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा हा सन्मान देशासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न हा भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ देणारा प्रतिष्ठेचा महोत्सव मानला जातो. या महोत्सवात दरवर्षी भारतीय कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या कार्याचा गौरव केला जातो. यावर्षी राणी मुखर्जीच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





