Sonam Wangchuk: “देशाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे!” सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर शबाना आझमींचे भावनिक आवाहन; स्वानंद किरकिरे यांनी काँग्रेसला केला सवाल
Sonam Wangchuk सोनम वांगचुक हे काही विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांसह दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा उद्देश 'नीट' परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे हा आहे.

Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत आता देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात वांगचुक सहभागी झाले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस असून, त्यांची तब्येत खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी भावनिक पोस्ट करत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तर गीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी काँग्रेस पक्षालाही थेट सवाल केला आहे.
सोनम वांगचुक हे काही विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांसह दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा उद्देश ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे हा आहे. उपोषणामुळे वांगचुक यांचे सुमारे ८.५ किलो वजन कमी झाले असून, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Sonam Wangchuk
याआधी अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेता ओमी वैद्य यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. ओमी वैद्य यांनी तर “सोनम वांगचुक यांना मरू देऊ नका,” असे भावनिक आवाहन केले होते.
आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय सोनम वांगचुक, आपल्या देशाला तुमच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. तुम्ही अन्यायाविरुद्ध आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभे आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. मात्र, मी तुम्हाला विनंती करते की, कृपया तुमचे उपोषण थांबवा. विद्यार्थ्यांसाठी तुमचे मार्गदर्शन आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. हा लढा दीर्घकाळ चालणार आहे, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहणेही तितकेच आवश्यक आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.”

swanand kirkire on Sonam Wangchuk hunger strike
शबाना आझमी यांच्या या पोस्टनंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. अनेकांनी सोनम वांगचुक यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी भावना व्यक्त केली.
दुसरीकडे, गीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनीही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत काँग्रेस पक्षावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी विचारले की, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस या आंदोलनात सक्रियपणे का दिसत नाही?
स्वानंद किरकिरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जर काँग्रेसला वाटत असेल की त्यांच्या विरोधात सतत षडयंत्र रचले जात आहे, तर त्यांनी स्वतः आंदोलनात सहभागी व्हायला हवे. त्यांना उपोषणाला बसण्यापासून नेमके कोण अडवत आहे?”
View this post on Instagram
ते पुढे म्हणाले की, “आंदोलन करणारे विद्यार्थी आणि कार्यकर्ते एका महत्त्वाच्या आणि वास्तववादी कारणासाठी लढत आहेत. त्यांच्या समस्या खऱ्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनीही त्यांच्यासोबत उभे राहून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा द्यायला हवा.”
दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला २५ दिवस पूर्ण झाले असून, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीत होत असलेल्या बिघाडामुळे सरकारने लवकरात लवकर संवाद साधावा आणि या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. शबाना आझमी आणि स्वानंद किरकिरे यांच्या पोस्टमुळे या आंदोलनाची चर्चा पुन्हा एकदा देशभरात रंगली आहे.





