चीनमध्ये आणखी एक पूल कोसळला, २ ठार १२ बेपत्ता

बीजिंग – चीनमध्ये एक भुयारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान २ जण ठार आणि १२ जण बेपत्ता झाले आहेत. चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांतात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आलेल्या पुरामुळे हा पूल कोसळला.
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास याआन-कांगडिंग एक्स्प्रेस वेच्या कांगडिंग शहर आणि लुडिंग काउंटी दरम्यानच्या भागातला हा पूल कोसळला आणि सहा जणांसह तीन वाहने डोंगराळ प्रदेशातल्या दरीत कोसळली, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
किमान १२ जण बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने रिडी गावात अनेक घरे उध्वस्त झाली आणि किमान दोन लोक ठार झाले असून या भागात शोध आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत दोघांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्कालिन व्यवस्थापन मंत्रालयाने मदतकार्यासाठी ३०० जणांचे पथक घटनास्थळी पाठवून दिले आहे.





