पुण्यात हुंड्याच्या छळाला कंटाळून आणखी एका नववधूची आत्महत्या; हडपसरमधील घटनेने खळबळ

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच पुण्याच्या हडपसर परिसरात हुंड्याच्या छळाला कंटाळून आणखी एका नववधूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवकी प्रसाद पुजारी ऊर्फ दीपा (वय २२) असे या विवाहितेचे नाव असून, तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हडपसर पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली असून, समाजात हुंड्यासारख्या जुन्या प्रथांचा पायंडा अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाचा विवाह १८ एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडी येथील बसव मंगल कार्यालयात प्रसाद चंद्रकांत पुजारी याच्याशी झाला. लग्नात दीपाच्या कुटुंबीयांनी ४ तोळे सोने आणि १० लाख रुपये खर्चून मानपान केले होते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात आल्यानंतर दीपाचा पती प्रसाद आणि सासू सुरेखा यांनी भांडी, फ्रीज यांसारख्या वस्तू दिल्या नाहीत, तसेच मानपान केला नाही म्हणून तिला शिवीगाळ आणि छळ सुरू केला.
दीपाने ही हकीगत वडिलांना सांगितल्यानंतर ती माहेरी गेली. सासऱ्याने समजूत घालून तिला पुन्हा पुण्यात आणले. मात्र, १८ मे रोजी दीपाने वडिलांना फोनवर रडत सांगितले की, पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून मारहाण आणि शिवीगाळ होत आहे. वडिलांनी तात्पुरती समजूत घातली, पण १९ मे रोजी दीपाने हडपसर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा, सासरे चंद्रकांत आणि दीर प्रसन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.





