बाबा सिद्दीकी प्रकरणात आणखी एकाला अटक; फेसबुक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरच्या भावाला अटक

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पुण्यातून अटक केली आहे.
पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद हे ज्या भंगाराच्या दुकानात काम करत होते त्या भंगाराच्या दुकानाच्या बाजूलाच प्रवीण लोणकर याच्या मालकीचे दुकान आहे. या हत्येसाठी प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी मिळून शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांना निवडल्याचा संशय पोलिसांना आहे.
हत्येच्या दिवशी काय घडले?
बाबा सिद्दिकींचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकींवर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या.
त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांना 10-15 दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती.





