समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात; महामार्गावरून कार 30 फूट खाली कोसळली; पती ठार तर पत्नी अन् मुलगा गंभीर जखमी

मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघात होण्याचे काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. बुलडाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर आज पर्यंतचा सर्वात भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच याच मार्गावर आणखी एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात झाला असून यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर कारला अपघात झाला असून संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ही भरधाव कार महामार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खाली कोसळली. या अपघातामध्ये चालक पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण कार अपघातामध्ये सुशीलकुमार थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची पत्नी आणि बाळ हे या आपतात जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे.





