सवंग लोकप्रियतेसाठी विविध योजनांच्या घोषणा- आ. बाळासाहेब पाटील

पुसेसावळी – राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई, गुन्हेगारी, जनतेच्या दैनंदिन गरजा याकडे सरकारचे लक्ष नाही. निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी विविध योजनांची घोषणा सरकारकडून होत आहे, अशी टीका आ. बाळासाहेब पाटील यांनी केली.
खटाव तालुक्यातील लाडेगाव व रेवली येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, सुरेश पाटील (बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तनाचे वारे असून, महाविकास आघाडीचे लोकाभिमुख सरकार लोकांना अपेक्षित आहे. त्याकरिता सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून, विकासाच्या पाठीशी खंबीर रहावे. लाडेगाव परिसराशी कारखान्याच्या माध्यमातून असलेला जिव्हाळा, मतदारसंघाच्या पुनर्रचनेने अधिक मजबूत झाला.
मला मिळणारा निधी मी मतदारसंघातील जनतेसाठी 100 टक्के वापरून, जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मंत्रिपदाचा कार्यकाळ अजून राहिला असता, तर लक्षणीय विकासकामे करता आली असती. या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी द्या.
कृष्णत पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष कदम यांनी आभार मानले. विलास शिंदे, मोहम्मद आवटे, दत्तात्रय रुद्रुके, सुरेश कदम, उपसरपंच सागर दीक्षित, सावळा बाबू यादव, रामचंद्र वाईकर, विष्णू वाईकर, बाळासाहेब यादव, बबन सुतार, माजी सरपंच संतोष कदम, उत्तम यादव (तात्या), कृष्ण पाटील, साईनाथ यादव, दीपक राऊत, कुंडलिक घाडगे, बाबासाहेब यादव, शिवाजी दबडे, नाथा यादव, अनिल उमापे, बाळासो उमापे, सचिन यादव, हणमंत घाडगे, भीमराव तिडके, योगेश यादव, जयवंत यादव, गणेश यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.





