Anjum Chopra : ‘भारतीय संघ यंदा विश्वचषक जिंकणार’; माजी कर्णधार अंजुम चोप्राने व्यक्त केला विश्वास
आगामी महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल, असा विश्वास भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्राने (Anjum Chopra) व्यक्त केला आहे.

Anjum Chopra : इंग्लंडमधील खेळपट्टी आणि हवामानाची परिस्थिती आता भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अनोळखी राहिलेली नाही. त्यामुळे आगामी महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल, असा विश्वास भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्राने (Anjum Chopra) व्यक्त केला आहे. विमेन इन ब्लू आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात १४ जून रोजी बर्मिंगहॅम येथे पाकिस्तानविरुद्ध करणार आहे.
अंजुम चोप्राने (Anjum Chopra) एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. नवोदित खेळाडूंमध्ये नंदिनी शर्मा पहिल्यांदाच तिथे खेळत असली, तरी श्री चरणीचा अवघ्या १२ महिन्यांतील हा दुसरा इंग्लंड दौरा आहे.
भारताचा समावेश ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यासह ‘गट १’ मध्ये करण्यात आला असून, ही वाट सोपी नसली तरी भारतामध्ये अंतिम दोन संघांत पोहोचून विजेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. (Anjum Chopra)
दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या यास्तिका भाटियेच्या कामगिरीचे अंजुमने कौतुक केले. यास्तिकाने पहिल्या टी-२० सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर ५४ धावांची दमदार खेळी केल्यामुळे जेमिमा रॉड्रिग्जला खालच्या क्रमांकावर पाठवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघ व्यवस्थापनाला फलंदाजीच्या क्रमात अधिक लवचिकता आणि जुळवून घेण्याची वृत्ती ठेवावी लागेल, असा सल्ला तिने (Anjum Chopra) दिला.
पाटीदार, सूर्यवंशीवर भाष्य (Anjum Chopra)
महिला क्रिकेट व्यतिरिक्त अंजुमने आयपीएलमधील स्टार खेळाडूंचाही गौरव केला. आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रजत पाटीदारमध्ये भारताच्या टी-२० संघात स्थान मिळवण्याची पूर्ण क्षमता आणि कौशल्य आहे, असे ती बोलताना म्हणाली.
तसेच, १५ वर्षीय फलंदाजीची सनसनाटी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना तिने नमूद केले की, मैदानाबाहेरील वाढती प्रसिद्धी आणि चाहत्यांचा वर्ग तो कशा प्रकारे हाताळतो, हीच त्याची सर्वात मोठी परीक्षा असेल.






