Anjali Bhagwat : ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या अंजली भागवतला कांस्यपदक; पित्याचे स्वप्न केले साकार!
जर्मनीतील सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत नाशिकच्या अंजली भागवत (Anjali Bhagwat) हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत कांस्यपदक पटकावले आहे.

Anjali Bhagwat : जर्मनीतील सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत नाशिकच्या अंजली भागवत (Anjali Bhagwat) हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत कांस्यपदक पटकावले आहे. पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या अंजलीच्या या यशामुळे तिचे कुटुंब, प्रशिक्षक आणि संपूर्ण नाशिककरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
अंतिम फेरीत दमदार झुंज; सांघिक कामगिरीत भारताला पदक
नाशिक येथील ‘भिष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंज’ आणि ‘द एक्स-एल टार्गेट शूटर्स असोसिएशन’ची गुणी खेळाडू असलेल्या अंजली महेंद्र भागवत (Anjali Bhagwat) हिने वैयक्तिक पात्रता फेरीत उत्कृष्ट अचूकता दाखवली. तिने अंतिम फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या अव्वल ८ खेळाडूंमध्ये सातवा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर झालेल्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम फेरीत अंजलीने दमदार लढत देत सहावे स्थान पटकावले.
वैयक्तिक पदक अगदी थोडक्यात हुकले असले, तरी अंजलीने हार मानली नाही. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २५ मीटर पिस्तूल महिला ज्युनियर सांघिक स्पर्धेत तब्बल १७१३ गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदकावर नाव कोरले. या भारतीय संघात अंजली भागवतसह परिशा गुप्ता आणि निथिला आयव्ही डार्लिंग ख्रिस्तोफर यांचा समावेश होता.
दिग्गज नेमबाज अंजली भागवत यांचा आदर्श अन् वडिलांचे स्वप्न!
अंजलीचे (Anjali Bhagwat) वडील महेंद्र भागवत हे स्वतः मोठे क्रीडाप्रेमी आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय कीर्तीची दिग्गज नेमबाज अंजली भागवत यांच्या खेळाने प्रेरित होऊन आपल्या मुलीनेही देशाचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी तिचे नाव ‘अंजली’ ठेवले होते.
मुलीला नेमबाजीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी नाशिकमधील नावाजलेली ‘भिष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंज’ निवडली. अंजलीनेही वडिलांचे हे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून अत्यंत जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने सराव केला. आज तिच्या या यशामुळे ‘अंजली भागवत’ हे नाव पुन्हा एकदा भारतीय नेमबाजी क्षेत्रात अभिमानाने झळकू लागले आहे.
क्रीडा जगतातून अभिनंदनाचा वर्षाव
अंजलीच्या (Anjali Bhagwat) या आंतरराष्ट्रीय यशाचे वृत्त समजताच नाशिकच्या क्रीडा वर्तुळात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंज आणि द एक्स-एल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या प्रशिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
“ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसारख्या मोठ्या जागतिक मंचावर भारतासाठी पदक जिंकणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अंजलीचे हे यश नाशिकमधील आणि विशेषतः इतर नवोदित नेमबाज मुलींसाठी मोठी प्रेरणा ठरेल,” अशी भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.






