अनिश दमानिया यांची सरकारच्या ‘थिंक टँक’मध्ये वर्णी; रोहित पवारांनी टीका करताच अंजली दमानियांनी केला उलघडा

Anjali Damania On Rohit Pawar | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या थिंक टँकमध्ये वर्णी लागली आहे. महाराष्ट्र सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणाऱ्या आणि धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ‘इंन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यावरून आता अंजली दमानिया यांच्यावर टीका केली जात आहे.
राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे मुद्दे समोर आणणाऱ्या आणि अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून पुरावे सादर करणाऱ्या म्हणून अंजली दमानिया यांची ओळख आहे. परंतु एकीकडे असे चित्र असतानाच अंजली दमानिया यांचे पती अनिश यांची सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्याने त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
दमानिया यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी टीका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारच्या मित्रा या संस्थेवर मानद सल्लागार पदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिश दमानिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा,’ असे रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे. Anjali Damania On Rohit Pawar |
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
यावर अंजली दमानिया म्हणाल्या, “माझे पती जे. एम. फायनॅन्शियल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मूख्य कार्यकारी अधिकारी होते. आता ते कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यावेळी गोयल यांनी अनिश यांना ‘फिक्की’ समितीचे सदस्य होण्याची विनंती केली होती. गोयल यांच्या विनंतीचा मान ठेवून अनिश फिक्कीचे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी मित्रा या समितीचं सदस्यत्व स्वीकारलं.”
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या, “माझे पती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर तिथे आहेत. ते राजकारणापासून दूर राहून देशासाठी काम करत आहेत. त्यासाठीच त्यांनी ‘फिक्की’ व ‘मित्रा’ची सदस्यता स्वीकारली. मानद सल्लागार म्हणून ते आता या समित्यांमध्ये असतील आणि राज्य सरकारला मार्गदर्शन करतील. एकही रुपया न घेता ते ही सगळी कामं करणार आहेत. ते केवळ कॅपिटल मार्केटमध्ये सल्ला देण्याचं काम करणार आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव पाहून सरकारने त्यांना हे सल्लागारपद स्वीकारण्याची विनंती केली होती, जी अनिश यांनी स्वीकारली. मी देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करते. आता माझे पती देखील देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत,” असे प्रत्युत्तर अंजली दमानियांनी रोहित पवार यांच्या आरोपांवर दिले.
हेही वाचा:




