वीजप्रश्न न सुटल्यास महावितरण कार्यालयासमोर जनावरे बांधणार

जवळा – महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नासंबंधी विचारले असता अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देतात. आमच्याकडे कामगार नाही, आमच्याकडे मटेरियल नाही, अशा प्रकारचे उत्तरे चालणार नाहीत. शेतकऱ्यांच्या व गावठाणच्या विविध विजेचे प्रश्न लवकर मार्गी लावावीत, अन्यथा जामखेड महावितरण कार्यालयासमोर जनावरे बांधून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उपसरपंच प्रशांत शिंदे यांनी दिला.
जवळा येथे महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात जामखेड- करमाळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक (समता नगर) येथे जवळा ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
सरपंच सुशील आव्हाड म्हणाले, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या काळात महावितरणचा कामकाजाचा बोजवारा उडालेला असतो. यामुळे जवळा ग्रामपंचायत व ग्रामस्थांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. यावेळी जवळा ग्रा. पं. सदस्य सावता हजारे, पत्रकार दीपक देवमाने, आरती देवमाने, कृष्णा चव्हाण, माजी सभापती सुभाष आव्हाड यांनी महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सुभाष रोडे, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, तात्या कसरे, किसन गोयकर, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर हजारे, डॉ. दीपक वाळुंजकर, कल्याण आव्हाड, प्रेम आव्हाड, अमोल हजारे, राहुल मासोळे, मिलिंद आव्हाड, दत्ता रोडेसह जवळा, मतेवाडी, गोयकरवाडी, बोर्ले गावचे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. जामखेड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, सहाय्यक अभियंता राजुळे, प्रभारी सहाय्यक अभियंता महेश पवार उपस्थित होते. यावेळी विजेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले
आंदोलन चालू असताना जामखेड-करमाळा रोडवर गाडयांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, हेड कॉ. संजय लोखंडे, हृदय घोडके, पो.कॉ.अमोल आजबे, योगेश दळवी, दत्तू बेलेकर गोपनीय शाखा अविनाश ढेरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
.





