Anil Parab : अश्लीलता पसरवायला लाज वाटत नाही का? अनिल परबांची कदम पिता- पुत्रांवर टीका

मुंबई : महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार ? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरावायला लाज वाटत नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. अनिल परब हे मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई उपनगरातील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या ‘सावली’ या बारचा मुद्दा पुन्हा उचलून धरला.
रामदास कदम यांनी, हा बार माझ्या पत्नीच्या नावे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या बारची मालकी कुणाकडे आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. पोलीस स्टेशनच्या नाकाखाली खाली गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. हे गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर रेड करायला जातात. का तर अश्लीलता पसरते म्हणून… अनैतिक धंदा आहे म्हणून… समाजविघातक कृती म्हणून हे अशा ठिकाणी छापा मारतात. त्याला हरकत नाही, हे चांगलं काम आहे. पण स्वत:च्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार ? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
अनिल परब पुढे म्हणाले की, मी आजच मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्याचे सगळे प्रताप भेटरुपाने देणार होतो. उद्या ते मुंबईत आल्यावर मी त्यांच्याकडे सगळी कागदपत्रे देणार आहे. सावली बारमध्ये डान्सबारचे सर्व नियम तुडवले गेले. ऑर्केस्टासाठी ५ मुलींची परवानगी असताना १४ मुली सापडल्या. नृत्य करताना मुली लगट करत होत्या, हे सगळे पोलीस रेकॉर्डमध्ये असल्याचे परब म्हणाले.
जगबुडीचा गाळ कॉलेजमध्ये कसा ?
रत्नागिरीच्या जगबुडी नदीतील गाळ काढला जातोय. उपसण्यात येणारा गाळ हा वाळू मिश्रित आहे. यातून वाळू वेगळी केली जातेय. ही वाळू योगिता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात पडली आहे. हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचे असून नदीतील वाळू या कॉलेजजवळ कशी आली? ही वाळू येथे काय करतेय? या वाळूचे काय केले जात आहे ? असे सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले. तसेच जिथे जिथे वाळू पडली त्याचे आम्ही जिओ टॅग लावून ड्रोन कॅमेरामार्फत शूट केले आहे. याचे फोटो, व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडून पुराव्यांना पेनड्राईव्ह देखील देणार असल्याचे परब म्हणाले.





