मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर उज्जवल निकमांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘एक नागरिक म्हणून…’

Ujjwal Nikam | मुंबईतील ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता याच घटनेतील १२ दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. १२ दोषींपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. या प्रकरणातील निकालावर सरकारी वकील उज्वल निकम यांनीही भाष्य केले आहे.
“मार्च १९९३ मध्ये ज्या पद्धतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले, तशाच पद्धतीने आरडीएक्स वापरून २००६ मध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात २०० ते २५० निरपराध प्रवासी या रेल्वे बॉम्बस्फोटात ठार झाले. त्यावेळेस टाडा कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली हा खटला चालवण्यात आला होता. या कायद्याखाली सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी काही आरोपींचे कबुली जबाबही घेतले होते. अर्थात हा खटला जरी मी चालवला नसला, तसेच या खटल्याबाबत वस्तुस्थिती माहिती नसली तरी प्रथमदर्शनी ही बाब स्पष्ट होते की, सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा मुख्य न्यायालयाने फिरवला,” असे उज्जवल निकम यांनी म्हंटले आहे. Ujjwal Nikam |
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचे मूल्यमापन करावे लागेल
“याचाच अर्थ असा की, ज्या पुराव्यांवर सत्र न्यायालाने शिक्षा दिली होती, तो पुरावा मुंबईच्या उच्च न्यायालयाने अग्राह्य मानला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तात केली. यातील काही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची देखील शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता हे सगळेच आरोपी निर्दोष म्हणून सुटल्याने एक नागरिक म्हणून नक्कीच मला जेवढं दुःख आहे तेवढं प्रत्येकालाच दुःख असेल यात शंका नाही. मात्र आता सरकारला या खटल्याची पुन्हा चाचपणी करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी लागेल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचे मूल्यमापन करावे लागेल,” असेही सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले. Ujjwal Nikam |
दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर 827 जण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणी 7 जणांना जन्मठेप, तर 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या पाच जणांनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
5 जणांना फाशीची शिक्षा
कमाल अन्सारी, मोहम्मद फैसल,नवीद हुसेन खान, अतौर रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि आसिफ खान या सर्वांना बॉम्ब ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. या पाचही जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील कमाल अन्सारीचा कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. आता उर्वरित चार जण निर्दोष ठरवण्यात आले आहेत.
7 जणांना जन्मठेप
जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये तनवीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझ्झम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहमान शेख यांचा समावेश आहे. या सातही जणांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. Ujjwal Nikam |
हेही वाचा





