Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकनंतर ‘हा’ दिग्गज टेनिसला करणार अलविदा, नावावर आहेत अनेक विक्रम…

Paris Olympics 2024 & Andy Murray : ऑलिम्पिक 2024 पॅरिसमध्ये आयोजित केले जात आहे. 26 जुलैपासून सुरू होत आहे. त्याचा शेवटचा दिवस 11 ऑगस्टला असेल. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे लक्ष आपल्या देशासाठी पदके जिंकण्यावर असेल. दरम्यान, एका स्टार टेनिसपटूने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून अँडी मरे आहे. अँडी मरेने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याची पुष्टी केली आहे. 37 वर्षीय खेळाडू आपल्या पाचव्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरी आणि दुहेरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे.
ग्रेड ब्रिटनचा खेळाडू अँडी मरेने त्याच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. मरेने एक्स X वर लिहिले की, “तो त्याच्या शेवटच्या टेनिस स्पर्धेसाठी पॅरिसला पोहोचला आहे. ग्रेट ब्रिटन संघाकडून खेळणे हा माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय क्षण आहे आणि शेवटच्या वेळी तो अनुभवताना मला खूप अभिमान वाटतो!”
ऑलिम्पिकमध्ये दोन एकेरी सुवर्णपदके जिंकणारा अँडी मरे हा पहिला खेळाडू आहे. या खेळाडूने 2008 मध्ये बीजिंग गेम्समध्ये पहिले ऑलिम्पिक खेळले. या खेळाडूने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरी टेनिसमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते. अँडी मरेने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरी टेनिसच्या अंतिम फेरीत रॉजर फेडररचा पराभव केला होता.
2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये अँडी मरेने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले होते, यावेळी त्याने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोचा पराभव केला होता. यासह तो 2 ऑलिम्पिक एकेरी सुवर्णपदके जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला होता. मरेने 2013 आणि 2016 मध्ये दोन विम्बल्डन विजेतेपदही जिंकले होते. मात्र, आता या दिग्गज खेळाडूने टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.





