जोहान्सबर्ग : मादागास्करचे माजी अध्यक्ष आंद्रे राजोएलिना यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे. राजोएलिना यांनी देशातून पलायन केल्यानंतर सत्तेत आलेल्या लष्करी प्रशासनाचे नवीन पंतप्रधान हेरिन्सालामा राजाओनारीवेलो यांनी राजोएलिना यांचे नागरिकत्व रद्द करण्याच्या आदेशांवर स्वाक्षरी केली. मादागास्करमध्ये महागाई, भ्रष्टाचाराविरोधात आठवड्याभरापासून जोरदार आंदोलन झाल्यावर राजोएलिनो यांनी देशातून पलायन केले. त्यांच्याकडे फ्रान्सचे नागरिकत्वही असल्यामुळे ते फ्रान्सला गेले असल्याचा अंदाज आहे. मात्र अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. राजोएलिना यांच्याकडे असलेल्या दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यामुळे २०२३ च्या अध्यक्षीय निवडणूकीत वाद उत्पन्न झाला होता. या निवडणुकीत राजोएलिना विजयी झाले होते. त्यांच्यावर नाराज असलेल्या आंदोलकांना लष्करातील महत्वाच्या तुकडीने पाठिंबा दिला होता. देशात आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देऊन राजोएलिना .ंनी पलायन केल्यावर लष्करातील कर्नल मिशेल रांद्रिएनिरीना यांनी सत्ता हाती घेतली आणि स्वतःला देशाचे अध्यक्ष घोषित केले.