Andre Russell : ‘कसोटी क्रिकेट फक्त मोठ्या देशांसाठीच खास…’, कोहलीच्या आवाहनला रसेलचे चोख प्रत्युत्तर

Andre Russell disagree Virat Kohli’s view on Test cricket : अलीकडेच आरसीबीने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर या संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली म्हणाला होता की, निवृत्तीनंतरही त्याच्यासाठी टेस्ट क्रिकेट हे आयपीएलपेक्षा पाच पायऱ्या वरचे आहे. यावर आता भारताचा माजी कर्णधार आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंद्रे रसेल विराटच्या या मताशी सहमत नाहीय. रसेलने यामागचे आपले तर्क मांडले असून त्याने म्हटले आहे की, टेस्ट क्रिकेट हे केवळ टॉपच्या देशांसाठीच चांगले आहे.
तरुणांनी कसोटी क्रिकेटचा आदर करावा – विराट कोहली
२००८ पासून आरसीबीसाठी आयपीएल खेळणाऱ्या विराट कोहलीने २०२५ मध्ये संघासाठी पहिली ट्रॉफी जिंकली. त्याआधी तो कसोटीतून निवृत्त झाला आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट म्हणाला होता की, “हा क्षण माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे, पण तो अजूनही कसोटी क्रिकेटपेक्षा ५ स्तरांनी खाली आहे. मी कसोटी क्रिकेटला खूप महत्त्व देतो आणि मला कसोटी क्रिकेट खूप आवडते. म्हणूनच मी येणाऱ्या तरुणांना या फॉरमॅटचा आदर करण्याचे आवाहन करेन.”
आंद्रे रसेल विराटच्या मताशी असहमत –
विराट कोहलीच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना आंद्रे रसेल म्हणाला की, त्याच्या मते फक्त मोठ्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधील खेळाडूंनाच कसोटी क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळते. ३७ वर्षीय हा अष्टपैलू खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून फ्रँचायझी क्रिकेटला महत्त्व देत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान, तो जवळजवळ सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिज संघात दिसला.
हेही वाचा – French Open 2025 : जोकोविचचा फ्रेंच ओपनमध्ये दारुण पराभव: यानिक सिनरची अंतिम फेरीत धडक
आंद्रे रसेल कसोटी क्रिकेटबद्दल काय म्हणाला?
द गार्डियनशी बोलताना आंद्रे रसेल म्हणाला, “मला वाटतं की जेव्हा तुम्ही भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमधून असता, जिथे कसोटी खेळाडूंची विशेष काळजी घेतली जाते, तिथे वेस्ट इंडिजमधून असण्यापेक्षा खूप फरक आहे. तिथल्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आणि मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी आकर्षक केंद्रीय करार मिळतात, त्यामुळे ते नक्कीच खेळू इच्छितात. पण वेस्ट इंडिजमध्ये? तुम्ही ५० किंवा १०० कसोटी सामने खेळू शकता, आणि तरीही तुम्हाला माहिती आहे की निवृत्तीनंतर तुमच्याकडे दाखवण्यासारखं फारसं काही नसतं.”
हेही वाचा – Yashasvi Jaiswal Controversy : जैस्वालच्या एलबीडब्ल्यूवरुन वाद; पंचांशी हुज्जत घातल्याने मैदानावर तणाव
मी स्वतःहून कसोटीकडे पाठ फिरवली नाही –
आंद्रे रसेल हा एक अनुभवी क्रिकेटपटू आहे, परंतु वेस्ट इंडिजकडून त्याने आतापर्यंत केवळ ५६ वनडे आणि ८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि एक कसोटी सामना खेळला आहे. रसेल पुढे म्हणाला, “मला सुरुवातीपासूनच कसोटी क्रिकेटच्या सेटअपमधून वगळण्यात आलं. त्यांनी मला फक्त पांढऱ्या चेंडूचा खेळाडू म्हणून पाहिलं आणि तेच झालं. मला कसोटी क्रिकेटवर विश्वास आहे, पण शेवटी मी एक व्यावसायिक खेळाडू आहे. कसोटी क्रिकेट हा माझ्या प्रवासाचा भाग नव्हता. मला याचा कोणताही पश्चात्ताप नाही, कारण मी स्वतःहून या प्रकाराकडे पाठ फिरवली नाही.”





