Pune District | आंद्रा, भामाआसखेड, मुळशीचा पाणीसाठा घटला

चाकण : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांशी जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा आहे; परंतु मावळ, मुळशी व खेडमधील सहा धरणांपैकी चार धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तलुनेत कमी तर दोन धरणात अधिक पाणीसाठा आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवना धरणात अधिक आणि आंद्रा व भामा आसखेड धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणात गतवर्षी 7 डिसेंबरला 84.29 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर आजमितीस या धरणात 86.06 टक्के पाणीसाठा आहे. यापैकी 207.36 दश लक्ष घनमीटर पाणीसाठा उपयुक्त आहे. पावसाने ओढ दिल्याने जूनमध्ये धरणातील पाणीसाठा 17 टक्क्यांवर आला होता. जून महिना कोरडा गेल्याने पाणी कपातीचे संकट ओढवले होते. साधारणपणे 15 जुलैनंतर आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणी पातळी सातत्याने वाढत गेली. आठवडाभर दमदार पाऊस झाला. धरणात 23 जुलैला 50 टक्के पाणीसाठा झाला होता. तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पवना धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले होते.
पिंपरी-चिंचवड शहराला सरकारकडून आंद्रा धरणातून शंभर आणि भामा-आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रतिदिन पाणी कोटा मंजूर केला आहे. दोन्ही प्रकल्पाची कामे सुरू आहेत. आंद्राचे पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधार्यातून गेल्या वर्षापासून उचलले जात आहे. कासारसाईचे पाणी सांगवडे गावाजवळ पवना नदीला मिळते. तर, वडिवळे आणि आंद्राचे पाणी इंद्रायणी नदीला मिळते. तर पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेकदा या जलाशयांमधील विसर्ग वाढविण्यात आला होता त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ही सर्वच जलाशये पूर्ण क्षमतेने भरल्याने या दोन्ही नद्यांना पूर आला होता.
पाणीसाठ्याची तुलनात्मक टक्केवारी
धरण – 2023 – 2024
पवना – 84.29 – 86.05
आंद्रा – 86.97 – 85.57
वडिवळे – 85.36 – 95.13
कासारसाई – 91.59 – 85.24
मुळशी – 81.30 – 77.53
भामा आसखेड- 86.15 – 85.10





