Andheri Subway : अंधेरी सबवेवरून विधानसभेत सत्ताधारी आमदार भडकले; सरकारला धरले धारेवर
Andheri Subway : अंधेरी सबवेच्या ५० वर्षे जुन्या प्रश्नावरून आमदार मुरजी पटेल आणि अमित साटम यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

Andheri Subway : गेल्या ५० वर्षांपासून पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या अंधेरी सबवेचा प्रश्न शुक्रवारी विधानसभेत पुन्हा एकदा गाजला. अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांनी या प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती. मात्र, तीन वेळा हा विषय सभागृहात मांडूनही सरकारकडून ठोस उत्तर किंवा तोडगा मिळत नसल्याने पटेल यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा सबवे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पूर्व-पश्चिम जोडणीसाठी गोखले पूल उपलब्ध आहे.
मात्र, गोखले पूल हा सबवेपासून तीन किलोमीटर लांब आहे आणि मंत्र्यांच्या उत्तरात स्पष्टता नाही, असे सांगत पटेल यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. गेली १५ महिने आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करत असूनही साधे उत्तर मिळत नसेल, तर नागरिकांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनीही या मुद्द्यावर मंत्र्यांना घेरले. पावसाळ्यात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढण्याची मागणी दोन्ही आमदारांनी केली. एकच लक्षवेधी वारंवार मांडूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी दिसून आली.





