Sinhagad Road – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रस्त्यावर महापालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही या परिसरात झालेल्या नागरीकरणामुळे आणि वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे हा पूलही अपुरा पडत आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्याय म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघातील विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी हा मुठा नदीच्या काठाने उन्नत (एलिव्हेटेड) रस्ता करण्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री, आमदार माधुरी मिसाळ यांनी हा पूल उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार हा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाण्यासाठी एकच मार्ग आहे. गेल्या दोन दशकांत या रस्त्याच्या बाजूला राजाराम पुलापासून पुढे सिंहगड पायथ्यापर्यंत दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. याशिवाय, पुणे-बेंगळुरू महामार्गावरून पुण्याकडे येणारी वाहनेही याच रस्त्याने शहरात प्रवेश करतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. या रस्त्याला पर्याय म्हणून महापालिकेने मुठा उजव्या कालव्याच्या बाजूने पु. ल. देशपांडे उद्यान ते फनटाइम सिनेमापर्यंत पर्यायी रस्ता विकसित केला आहे. आमदार माधुरी मिसाळ मात्र, हा रस्ता वडगाव बु. परिसरासाठी अधिक सोयीचा आहे. पुढे धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, नांदेड सिटी, खडकवासला, डोणजे येथे जाणाऱ्या वाहनांसाठी एकच रस्ता उपलब्ध आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची २४ तास वर्दळ असते. परिणामी, आणखी एक पर्यायी रस्ता करण्याची मागणी होत आहे. दहा वर्षांपूर्वी उखडून काढला रस्ता… महापालिकेकडून सिंहगड रस्त्याला पर्यायी म्हणून विठ्ठलवाडी ते वारजे पूल असा मुठा नदीच्या काठाने रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याला आक्षेप घेत त्याविरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही गेला. न्यायालयाने उर्वरित रस्ता उन्नत (एलिव्हेटेड) करण्यास मान्यता दिली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने या सूचनेकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले. त्यामुळे दाखल झालेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीत तब्बल २३ कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा रस्ता उखडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हा रस्ता महत्त्वाचा असल्याने तसेच न्यायालयीन अनुभव लक्षात घेता मिसाळ यांनी हा रस्ता उन्नत करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.