Andharban Trek Closed: अंधारबन ट्रेक पर्यटनासाठी बंद! ४ ठिकाणी दरड कोसळल्याने वन विभागाचा निर्णय..परत कधी होणार सुरू?
Andharban Trek Closed: मुसळधार पावसामुळे ट्रेक मार्गाची झालेली दुरवस्था पाहता कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी वन विभागाने घेतला निर्णय.

Andharban Trek Closed – सुधागड वन्यजीव अभयारण्यातील अंधारबन नेचर ट्रेल पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ट्रेक मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. मात्र, कुंडलिका व्हॅली पॉइंट हा परिसर पर्यटकांसाठी खुला राहणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. वन विभागाने आठ जुलै रोजी केलेल्या पाहणीत ट्रेक मार्गावरील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे आढळले. दोन ठिकाणी रेलिंगचे मोठे नुकसान झाले असून, तेथून जोरदार पाण्याचा प्रवाह वाहत आहे.
चार ते पाच ठिकाणी डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे वाहून आले आहे, तसेच काही ठिकाणी तीन ते चार फूट उंचीपर्यंत चिखल साचल्याने ट्रेक मार्ग चालण्यायोग्य राहिला नसल्याने हा निर्णय घेतला आहे. येथील एका ओढ्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून, तेथील दोन्ही लोखंडी पूल, दरड आणि मलब्यामुळे वाहून गेले आहेत. डोंगरावरून आलेल्या प्रचंड दरडीमुळे पुलाच्या परिसरातील सुमारे १५ ते २० फूट उंचीपर्यंतचा भाग निसरडा झाला असून,
त्या ठिकाणी अद्यापही वेगाने पाणी वाहत असल्याने पुढे जाणे शक्य नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणताही पर्यटक अडकून पडला नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. मात्र, भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ९ जुलैपासून अंधारबन ट्रेक मार्ग पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.
ट्रेक मार्गाची सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत हा बंद कायम राहणार आहे. सर्व नागरिक आणि पर्यटकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी ऑनलाइन शुल्क भरले असेल, त्यांना तारखेपर्यंत अंधारबन ट्रेक सुरू न झाल्यास किंवा पर्यटकांना पुढील तारीख नको असल्यास शुल्क परत केले जाणार आहे.





