प्रभात वृत्तसेवा माथेरान – यावर्षी थर्टी फर्स्ट बुधवारी अर्थात आठवड्याच्या मधल्या कामकाजाच्या दिवशी आल्याने आणि त्यातच एकादशी असल्यामुळे आणि सलग सुट्टी नसल्याने माथेरानमध्ये शुकशुकाट होता.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकच न आल्याने निसर्गरम्य माथेरानमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. थंडगार, आल्हाददायक वातावरण असूनही पर्यटकांचा अपेक्षित ओघ न आल्याने पर्यटनावर अवलंबून असलेले येथील नागरिक व व्यावसायिक निराश झाले आहेत.थर्टी फर्स्ट सहसा उत्साह, गर्दी आणि व्यवसाय वाढवणारा दिवस मानला जातो. मात्र यंदा हा दिवस कामकाजाच्या मधोमध आल्याने अनेकांनी बाहेरगावी जाणे टाळले. विशेष म्हणजे बदलापूर, शेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत या परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या फॉर्महाऊसकडे पर्यटकांचा कल वाढल्याचे दिसून आले. सर्व सुखसोयी असलेली आकर्षक पॅकेजेस, तसेच अनेक ठिकाणी तांत्रिक नियमांची सक्ती नसल्याने पर्यटकांनी माथेरानपेक्षा फॉर्महाऊसना प्राधान्य दिले. पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरानमधील हॉटेल, लॉज, घोडेवाले, हातगाडीवाले, दुकानदार आणि छोटे व्यावसायिक सलग सुट्ट्या व पीक सीझनकडे मोठ्या आशेने पाहत असतात. मात्र यंदा थर्टी फर्स्ट बुधवारी आल्याने ही अपेक्षा फोल ठरली. बुधवार हा खास खवय्यांसाठीचा दिवस असला, तरी कामकाजाचा मधला दिवस असल्याने पर्यटकांची पावले थांबली. आज माथेरानमध्ये रस्ते, बाजारपेठा, पर्यटनस्थळे शांत दिसत असून नेहमीची गर्दी पूर्णपणे गायब आहे. अनेक व्यावसायिकांनी या काळात मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. जिकडे तिकडे शांतता पसरली असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.एकूणच, यंदाचा थर्टी फर्स्ट माथेरानसाठी आनंदाचा नव्हे तर गारठवणारा ठरला असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या या शहराला सलग सुट्ट्या व योग्य नियोजनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.