Andekar murder revenge | वडील आरोपी, मुलगा टार्गेट! ; पुण्यात गँगवारचे खतरनाक वळण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच, आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. शुक्रवारी रात्री ७:४५ वाजता नानापेठ नवरंग मित्र मंडळाजवळ झालेल्या हल्ल्यात गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर (वय १९, रा. नाना पेठ) याचा पिस्तूलातून तीन गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. विशेष म्हणजे डीजेवर टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया दो ये मटका, हे गाण वाजवत खून करण्यात आला.
गोविंदचा वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. तो वनराजचा दाजी लागतो तर गणेश हा भाचा लागतो. त्यामुळे आंदेकर टोळीने त्याचा मुलगा टार्गेट करून गेम केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे टोळीने रेकी या परिसरात केली होती. मात्र, प्रत्यक्ष हल्ला दुसरीकडे घडवून आणला.
भीतीचे वातावरण, पोलिसांवर प्रश्नचिन्ह..
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नानापेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे शहरात उत्सवानिमीत्त आठ हजार पोलिसांचा खडा पहारा आहे.
आंबेगाव पठारात रेकी ; नाना पेठेत गेम..
आंदेकर टोळीने पूर्वी आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली होती. या भागात वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आदी १३ जणांची घरे आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. गणेश पेठ) याला पकडून चौकशी केली असता त्याच्याकडून हा धक्कादायक प्रकार समोर आला. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याची आग आंदेकर टोळीत धुमसत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
“दोन व्यक्ती गोळीबार करून पळून जाताना दिसत आहेत. प्राथमिक तपासात तीन गोळ्या लागलेल्या दिसत आहेत. बंडू आंदेकर आणि कोमकर कुटूंब शेजारी शेजारीच रहाते.”
– निखील पिंगळे, उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे





