पाटणा – केंद्र सरकार आणि भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देशभरातील 15 विरोधी पक्ष एकत्र आले होते. या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भर पत्रकार परिषदेत वडिलकीच्या नात्याने कॉंग्रेसचे माजी खासदार राहुल गांधींसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि राहुल गांधी यांनी या प्रस्तावाला होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यामुळे राहुल गांधी लवकरच लग्याच्या बेडीत अडकणार असे दिसते आहे.
लालू यादव म्हणाले की, दाढी वाढवू नका, लग्न करा. आमच्या सर्वांचा सल्ला ऐकून लग्न केले पाहिजे होते. पण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. लग्न करा म्हणजे आम्ही सर्व अतिथी बनून येऊ.
तुमच्या लग्नाबद्दल आम्ही तुमच्या आईसोबत (सोनिया गांधी) बोलतो. तुम्ही माझी आज्ञा मानून लग्न करावे, असे लालू यादव म्हणाले. यावर राहुल गांधी यांनी तुम्ही बोललात म्हणजे आता लग्न होईल, असे उत्तर दिले.