“…आणि देवानी सांगावा धाडला” जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनानंतर अश्विनीने शेअर केला अनुभव

Ashvini Mahangade : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा ती सोशल मीडियावर वैयक्तिक आणि कामाच्या अपडेटबाबत माहिती देताना दिसते. नुकतेच तिने जेजुरीला खंडोबाचे दर्शन घेतले. येथील एक व्हिडिओ शेअर करत तिचा अनुभव अश्विनीने चाहत्यांना सांगितला आहे.
जेजुरी दर्शनाचा एक व्हिडिओ शेअर करत अश्विनीने पोस्टमध्ये लिहिले की, यळकोट यळकोट जय मल्हार…. सदानंदाचा येळकोट.. अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं.. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणे झाले, गेल्या वर्षी मन मंदिरा गजर भक्तीचाचे वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केले पण गडावर दर्शनासाठी जाणे झालेच नाही. मी जेव्हा तिथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच मनात यायचे की देवाने अजून बोलावणे केलेच नाही. कधी योग येणार? कधी दर्शन होणार? आणि देवानी सांगावा धाडला. दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवले ते मांडता येणे कठीण.” खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर अश्विनीने तिचा आनंद या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
अश्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अश्विनी सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळत आहे. याआधी ती ‘‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच ‘राणूबाई जाधव’ (राणू आक्का) यांच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. यानंतर आता ती लवकरच ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 2024 ला रिलीज होण्याची शक्यता आहे.





