अन् अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले; राहुल नार्वेकरांच्या कृतीमुळे चर्चेला उधाण !

मुंबई – मुंबईत गुरुवारी मनोरा आमदार निवासाच्या भूमीपूजनाचा सोहळा संपन्न झाला. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसण्यास सांगितले. नार्वेकरांच्या या कृतीची राज्याच्या वर्तुळात गरमागरम चर्चा सुरू असताना शिंदेंच्या समर्थक आमदारांनी मात्र सरकार दरबारी सर्वकाही सुरुळीत सुरू असल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणास्तव आमदार निवासाच्या बांधकामाच्या भूमीपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार नार्वेकरांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या खुर्चीत जाऊन बसले.
याविषयी शिंदे यांचे समर्थक भरत गोगावले याना छेडले असते त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हा कार्यक्रम उरकून घेण्याचे सांगितले होते. कारण अंगात ताप व कणकण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो.
यावेळी त्यांनी अजित पवारांनी शिंदेंच्या खुर्चीवर जावून बसण्यात काहीही गैर नसल्याचाही युक्तिवाद केला. उपमुख्यमंत्री पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले. हे अनावधानाने घडले. त्यात काहीही गडबड नाही. आमदारांसाठी एक भव्य वास्तू उभी राहत आहे. याचा आम्हाला आनंद व समाधान आहे, असे गोगावले पुढे म्हणाले.
शिंदेंची विधानसभेत मात्र हजेरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार निवासाच्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित नव्हते. यासाठी त्यांनी अंगात कणकण असल्याचे कारण दिले. पण त्यानंतर ते विधानसभेतील कामकाजाला हजर असल्याचे दिसून आले. त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीच्या प्रक्रियेतही सहभाग घेतला. त्यामुळे भूमीपूजन सोहळ्याला कणकण असल्याचा दाखला देत दांडी मारणारे शिंदे नंतर विधानसभेत कसे काय उपस्थित राहिले? याचीही गरमागरम चर्चा सुरू होती.
नार्वेकरांकडेच निर्णय; त्यांच्या मनात काही असेल
या प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. “मला असे वाटते की, त्यांच्याकडेच सर्व निर्णय आहेत, त्यांच्या मनात काही असू शकते’, अशी मिश्किल प्रतिक्रीया दानवेंनी दिली आहे.





