शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची निघृण हत्या

न्यूयॉर्क – उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची बेघर गर्दुल्याने हातोडीचे घाव घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. जॉर्जिया प्रांतातील लिथोनिया शहरामध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्या झालेला भारतीय विद्यार्थी या गर्दुल्याला गेल्या दोन दिवसांपासून मदतच करत होता. या हत्येचा प्रसंग सीसीटिव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे.
हत्या झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचे नाव विवेक सैनी असे आहे. ज्युलियन फॉलनर या व्यसनाधीन युवकाने विवेकच्या डोक्यावर हातोडीने तब्बल ५० वेळा वार केल्याचे या व्हिडीओमध्ये आढळून आले आहे. विवेक सैनी हा मूळचा हरियाणातील असून त्याने बी.टेक. केले होते आणि दोनवर्षांपूर्वी तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता.
अलिकडेच एमबीएची पदवी मिळवली होती आणि तो एकास्टोअरमध्ये अर्धवेळ नोकरी करत होता. त्याने फॉलनरला आश्रय दिला होता. त्याने फॉलनरला खाद्यपदार्थ आणि थंडीपासून वाचण्यासाठी जॅकेटही दिले होते.
मात्र १६ जानेवारीला सैनीने सुरक्षिततेच्या कारणास्तव फॉलनरला स्टोअरमधून जाण्यास सांगितले. त्याने पोलिसांना कळवण्याची धमकीही दिली. पोलीस घटनास्थळी पोचले तेंव्हा विवेक सैनीच्या मृतदेहाजवळ फॉलनर शांतपणे उभा असल्याचे आढळले.





