शेतांमधून घोणस सापांची वाढतेय संख्या; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे सर्पमित्रांचे आवाहन

पुणे – मावळ भागात गेल्या 30 दिवसांत तब्बल 50 पेक्षा जास्त घोणस (रसेल वाइपर) जातीचे साप पकडण्यात आले असून, शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन वन्यजीव बचाव पथकाद्वारे करण्यात आले आहे. घोणस हा अत्यंत विषारी साप आहे. घोणस या सापांचा सध्या वीणीचा हंगाम आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हे साप आढळतात. त्यातून सध्या भातकापणी सुरू असल्याने या शेतात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.
वीणीचा काळ असल्याने हे जोड्यांनी आढळतात. या काळात ते अधिक आक्रमक असतात. शेतात त्यांचा वावर असतोच परंतु मानवी वस्तीत ते आढळत असल्याने एकट्या मावळ तालुक्यात वन्यजीव बचाव पथकाने 50 पेक्षा जास्त घोणस सापांना मानवी वस्तीतून पकडून त्यांना दूर नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. घोणसचे शरीर जाड, तपकिरी रंग, डोके त्रिकोणी आणि हिऱ्याच्या/बदामाच्या आकाराच्या डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत खवल्यांसारखे ठिपके असतात.
हा साप प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखाच आवाज काढतो. तो स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि शत्रूला दूर ठेवण्यासाठी स्वसंरक्षणार्थ हा इशाऱ्याचा आवाज असतो. या सापाच्या एकूण दिसण्यावरून तो पाहताक्षणी अजगर वाटू शकतो. त्यामुळे तो बिनविषारी आह, असा समज सुरुवातीला होऊ शकतो, कारण अजगर हा बिनविषारी आहे. परंतु घोणस हा अत्यंत विषारी साप आहे. मावळ भागातून गेल्या 30 दिवसांत 50 पेक्षा जास्त घोणसची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले आहे, अशी माहिती मावळच्या वन्यजीव बचाव पथकाचे संस्थापक नीलेश गराडे यांनी दिली.
ही काळजी घ्या…
- शेतात राहणाऱ्या नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
- आजूबाजूला असणारे खड्डे बुजवावेत.
- रात्री टॉर्चचा वापर करावा.
- शेतात काम करताना बूट घालावेत.
- जमिनीवर झोपलेल्या लोकांनी मच्छरदाणी वापरावी.
- सापाला अजगर समजू नका, खात्री करा.
- त्याला न मारता पकडून, जंगलात सोडून द्या.
- जर स्वत:ला पकडणे शक्य नसेल तर जवळच्या प्राणी बचावकांशी आणि वनविभागाशी संपर्क साधा.
- हा साप चावल्यास ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जा.





