Elvish Yadav : प्रसिद्ध युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव ऊर्फ सिद्धार्थ याला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करणे आणि त्यामध्ये अंमली पदार्थ म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याच्या गंभीर आरोपांखाली एल्विशवर दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने हा आदेश पारित केला. एल्विसने आपल्या याचिकेद्वारे वन्यजीव (संरक्षण) कायदा आणि अंमली पदार्थ व मनोविकारद्रव्ये कायदा अंतर्गत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला आव्हान दिले होते, ज्यावर न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेतली. एल्विश यादववर आरोप होता की, त्याने नोएडा आणि आसपासच्या परिसरातील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापांचे विष पुरवले होते. या पार्ट्यांमध्ये विदेशी महिलांना आमंत्रित केले जात असे आणि मनोरंजनासाठी सापाच्या विषाचा नशेसाठी वापर केला जात असे, असा दावा तक्रारदारांनी केला होता. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.