Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कर्णपुरा भागात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. झोपेत असताना विषारी साप चावल्याने १३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी पवार असे मृत मुलीचे नाव आहे. वैष्णवीचे वडील हे बांधकाम मजूर आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मध्यरात्री दोनच्या सुमारास वैष्णवी नेहमीप्रमाणे अंथरुणावर झोपलेली असताना अचानक विषारी सापाने खोलीत शिरकाव केला आणि वैष्णवीचा चावा घेतला. चाव्याचा वेदनादायक अनुभव जाणवताच ती घाबरून रडू लागली. घरच्यांनी तातडीने काय घडले ते समजून घेतले आणि तिच्या पायावर सापाने चावा घेतल्याचे दिसताच गोंधळ उडाला.
तिचे वडील आणि आईने तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, विषाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच वैष्णवीचा मृत्यू झाला.





