“राजकारणातील अनुभवी, संघर्षातून घडलेला…”; कलमाडींच्या निधनानंतर शरद पवारांची भावुक पोस्ट

Sharad Pawar On Suresh Kalmadi | काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. शरद पवार आणि कलमाडींची घट्ट मैत्री होती. शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडी यांनी अख्खी दिल्ली मॅनेज केली होती. मात्र त्यांचे ते स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही.
मागील वर्षी सुरेश कलमाडी यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्या दोघांची ही अखेरची भेट ठरली. कलमाडींच्या निधनानंतर शरद पवारांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
शरद पवारांची पोस्ट –
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
केंद्रीय मंत्री, ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला,” असे शरद पवार यांनी पोस्ट करत म्हंटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे… pic.twitter.com/yHXWfonjmc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2026
“राजकारणात मतभेद, संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतात; मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सातत्याने जपली. सार्वजनिक जीवनातील चढ-उतारांमधून जात असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास सोडला नाही. Sharad Pawar On Suresh Kalmadi |
दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्वजण कलमाडी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हिच प्रार्थना!” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Sharad Pawar On Suresh Kalmadi |
हेही वाचा:
“मी अजूनही राष्ट्रपती आहे…!” निकोलस मादुरो यांची न्यायालयात गर्जना ; आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव





