Rahul Gandhi : आंदोलकांवरील कारवाईबद्दल उत्तर द्यावेच लागेल..! राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल
विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा लक्ष्य केले.

Rahul Gandhi | Amit Shah – विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा लक्ष्य केले. शहा यांना त्या कारवाईबद्दल आज नाहीतर उद्या उत्तर द्यावेच लागेल, असे त्यांनी म्हटले.
उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये शनिवारी कॉंग्रेसच्या वतीने छात्रों की गुंज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राहुल यांनी तरूणाईशी संवाद साधला. त्या संवादाचा संदर्भ देऊन राहुल यांनी रविवारी सोशल मीडियावरून पुन्हा शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले.
माझ्याकडे आता कुठलाच पर्याय उरलेला नाही, असे एक विद्यार्थी प्रयागराजमध्ये माझ्याशी बोलताना म्हणाला. अनेक वर्षांची तयारी, कौटूंबिक जमिनीची विक्री, पालकांवरील कर्जाचा बोजा या सगळ्यांनंतरही हाती काहीच नाही. ती त्या विद्यार्थ्याची नव्हे; तर व्यवस्थेची हार आहे. त्या व्यवस्थेने विद्यार्थ्याला मेहनतीचा मोबदला देण्यास नकार दिला, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.
दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी तीव्र आंदोलन केले. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. त्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. ते सत्र पुढे नेत राहुल यांनी अनेक दिवस उलटून गेले तरी शहा अद्याप एक शब्दही बोलले नसल्याचे म्हटले.
उत्तरदायित्वाची मागणी आम्ही थांबवू असे शहांनी समजू नये. विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईबद्दल माफी मागण्याऐवजी मोदी माफ करत आहेत, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. त्यामुळे राहुल आणि कॉंग्रेस तो मुद्दा यापुढेही लावून धरणार असल्याचे सूचित झाले.





