Lawyer News – मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील स्थानिक न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका वकिलाला न्यायाधिशांचा इतका राग आला की त्याने सुनावणी सुरु असताना आपल्या पायातील बूट न्यायाधीशाच्या दिशेने फेकला. बूट चेहऱ्यावर लागू नये म्हणून संबंधित न्यायाधीश खाली वाकले असता, त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे. हे कृत्य केल्यानंतर हा वकील न्यायालयातून पळून गेला. नितीन अटल असे या वकिलाचे नाव आहे. अटल यांच्या विरोधात आयपीसी कलम ३३२, ३५३, २९४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. ही घटना काल सोमवारी दुपारी ४ वाजताची आहे. आगर माळवा जिल्हा न्यायालयात नियुक्त प्रथम जिल्हा आणि अतिरिक्त न्यायाधीश प्रदीप दुबे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयात कुटुंबवादाच्या उलटतपासणीदरम्यान आगर माळवाचे वकील नितीन अटल यांनी त्यांच्या हातातून पॉवर ऑफ अॅटर्नी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर वाद वाढत असताना वकील नितीन अटल यांनी त्यांच्यावर बूट फेकला. कोणाला काही समजण्याआधीच वकिलांनी तेथून पळ काढल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. न्या. दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वकील अटल यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि असभ्य वर्तन अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.