अमृता फडणवीस म्हणाल्या,“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही केला उल्लेख

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी पण त्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केल्याने सर्वांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
अमृता फडणवीस सोमवारी नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असे वक्तव्य केले. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यात कमतरता नाही, पण आम्ही असं करत नाही. आमचं तसंच दिसून येतं.” असे त्यांनी म्हटले.
अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम में सम्मलित हुई और कार्यक्रम को सम्बोधित किया। इस दौरान साथ में मा.अमृता फडणवीस जी,विधायक मा. सिमा हिरे जी, विधायक मा. देवयानी फरांदे जी के साथ अन्य मान्यवर उपस्थित थे। pic.twitter.com/0rCCkqeSg5
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) November 14, 2022
“आमची ती महानता तशीच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कधीच हे पद मागितलं नाही. देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
“आज मी तुमच्या मागण्या वाचल्या आणि ऐकल्या. सतीशजी मी पूर्णपणे तुमच्या मागे आहे. पंचवटी विभागात १२ वर्षांपासून आपली इमारत अडकली आहे. आता या प्रश्नावर उपाय निघालाच पाहिजे,” असेही अमृता फडणवीसांनी नमूद केले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारही उपस्थित होत्या. त्यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली.





