Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाचे पुण्यात पडसाद; शेतकरी कर्जमाफीसह नेमक्या मागण्या काय? जाणून घ्या सविस्तर…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या 14 मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
बच्चू कडू यांच्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी, विशेषतः महिलांनी, आक्रमक पवित्रा घेतला. ‘बच्चू कडूंना न्याय द्या’ अशा घोषणांनी कार्यक्रमस्थळ दणाणले, तर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कडू यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आंदोलन तीव्र होत असताना, महायुती सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांसमोरच घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना प्रहार कार्यकर्त्यांनी, विशेषतः महिलांनी, शेतकरी कर्जमाफी आणि बच्चू कडू यांच्या मागण्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला. कडू गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. तिवसा वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी कडू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे पत्र तहसीलदारांना लिहिले आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चेसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः कडू यांच्याशी बोलून त्यांच्या मागण्यांसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. या समितीत कडू यांचाही समावेश असेल, आणि समितीच्या अहवालानंतर सरकार योग्य निर्णय घेईल,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
बच्चू कडू यांचा इशारा
बच्चू कडू यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “कर्जमाफीबाबत तातडीने निर्णय व्हायला हवा. सरकार समिती नेमणार आहे, पण निर्णय कधी होणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे आम्ही उपोषण सुरू ठेवले आहे. जर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही, तर 16 जूनपासून जलत्याग करून आंदोलन तीव्र करू.” असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या काय?
दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मासिक मानधन.
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आणि MSP वर 20% अनुदान.
7 एप्रिल 2025 च्या बैठकीनुसार शासन निर्णय.
युवकांना रोजगार किंवा सन्मानजनक वेतन, रिक्त जागा तातडीने भरणे.
ग्रामीण घरकुलांसाठी 5 लाख रुपये अनुदान.
शेतमजुरांसाठी अपघाती मृत्यू सहाय्य आणि स्वतंत्र मंडळ.
पेरणी ते कापणी MSP आधारित मजुरी, फळपिकांना 3:5 रेशो, दुग्ध व्यवसायाला MSP.
सेंद्रिय खतांना अनुदान.
मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण.
मनरेगा मजुरी 312 वरून 500 रुपये.
निवासी अतिक्रमण नियमित करणे.
दुधाला आधारभूत किंमत: गायीचे दूध 50 रुपये/लिटर, म्हशीचे दूध 60 रुपये/लिटर.
कांदा निर्यातबंदी 40 रुपये/किलो बाजारभावापर्यंत टाळणे.
ऊस पिकाला 4,300 रुपये/टन (1% रिकव्हरी) आणि 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP, स्वतंत्र रिकव्हरी यंत्रणा.
आंदोलनाचे पडसाद
बच्चू कडू यांच्या आंदोलनाने अमरावतीपासून पुण्यापर्यंत पडसाद उमटले आहेत. शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला. कडू यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारच्या पुढील प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




