Amravati Accident : दोन कार समोरासमोर धडकल्या; ३ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी

Amravati Accident : अमरावतीमध्ये दोन कारची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोला मार्गावर घडली. या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
आनंद बाहकर ( 26), बंटी बिजवे (38), प्रतीक बोचे (35) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे कारने अकोलाकडे जात होते. त्यांच्या दिशेने आकाश अग्रवाल यांची कार येत होती. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कार समोरासमोर धडकल्या.
हा अपघात एवढा भीषण होता की, प्रतीक बोचे आणि बंटी बिजवे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद बाहकर याला दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या अग्रवाल पिता पुत्रांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.





