Amit Shah : अमित शहांनी फेटाळला नक्षलींचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांनी पुढे केलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळला. शस्त्रे खाली ठेऊन शरण येण्याची इच्छा असणाऱ्या नक्षलींच्या कृतीचे स्वागत केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. साधारणपणे पंधरवड्यापूर्वी नक्षलींनी केंद्र सरकारसमोर कथितपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. त्यावर नक्षलमुक्त भारत या विषयावरील परिसंवादात बोलताना शहा यांनी भाष्य केले.
अलिकडेच संभ्रम निर्माण करण्यासाठी एक पत्र लिहिण्यात आले. आतापर्यंत जे काही घडले; ते चुकीचे होते. शस्त्रसंधी करायला हवी. आमची (नक्षली) शरण येण्याची इच्छा आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले. मात्र, शस्त्रसंधी होणार नसल्याचे मी सांगू इच्छितो. नक्षलींची शरण येण्याची इच्छा असेल तर शस्त्रसंधीची गरज नाही.
नक्षलींनी शस्त्रे खाली ठेवल्यास सुरक्षा दलांकडून त्यांच्यावर एकही गोळी झाडली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. देशाला ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त बनवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्धाराचाही शहा यांनी पुनरूच्चार केला. संबंधित संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मागील काही काळापासून सुरक्षा दले नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवत आहेत. त्या मोहिमांमध्ये बहुतांश म्होरक्यांसह अनेक नक्षली मारले गेले आहेत.





