Amit Shah : नक्षलींना पावसाळ्यातही विश्रांती मिळणार नाही; अमित शहांनी दिला इशारा

रायपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी नक्षलवाद्यांना निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी नक्षलींना पावसाळ्यातही विश्रांती मिळणार नाही. त्यांच्या विरोधातील सुरक्षा दलांच्या माेहिमा चालूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नक्षलींशी चर्चेची शक्यता फेटाळून लावली.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादमुक्त बनवण्याचा संकल्प केला आहे. त्याचा पुनरूच्चार शहा यांनी छत्तीसगढमधील एका कार्यक्रमात बोलताना केला. प्रत्येक पावसाळ्यात नक्षलींना विश्रांती मिळते. नद्यांना पूर आल्याने घनदाट जंगलांमधील नक्षलविरोधी मोहिमा प्रभावित होतात. मात्र, यावेळी पावसाळ्यातही नक्षलींना स्वस्थ झोप घेता येणार नाही.
संकल्पपूर्तीसाठी पाऊले उचलली जातील. नक्षलींशी चर्चा करण्याची गरज नाही. त्यांनी सशस्त्र संघर्ष सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारचा संकल्प तडीस नेण्यासाठी सुरक्षा दलांकडून नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे दीड वर्षाच्या कालावधीत छत्तीसगढमध्ये सुमारे ४०० नक्षलवादी मारले गेले. त्याशिवाय, अनेक नक्षलींनी शरणागती पत्करली. तर, काहींना अटक करण्यात आली.





