अमित शाहांकडून लोकसभेत बीड आणि कोल्हापूरचा उल्लेख; मंदिरावर वक्फचा दावा

Amit Shah On Waqf Amendment Bill | मध्यरात्री विरोधी पक्षांच्या विरोधाभासांमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली, तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले. आज हे विधेयक राज्यसभेतही मंजूर होण्याची शक्यता आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. विरोधकांकडून वक्फ दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. मात्र संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले.
यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दोन गावांमधील मंदिरांवर वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. याचबरोबर बीडमधील कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. 1951 मध्ये मंदिर ट्रस्टने 55 एकर जागा घेतली.
2017 मध्ये 12 एकर विकली. पण या जागेवर वक्फने दावा केला. वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रात 31,216 मालमत्ता असल्याचे केंद्राने संसदेत सांगितले. मात्र, वक्फ बोर्डाच्या संकेतस्थळावर मात्र अजूनही 23,566 मालमत्तांचीच नोंद आहे. यात सर्वाधिक मराठवाड्यात 15,877 मालमत्ता असून ही जागा 23,121.10 हेक्टरवर आहे. यापैकी 60 टक्के जागांवर अतिक्रमण आहे,” असेही त्यांनी म्हटले.
अमित शाह म्हणाले, “तेलंगणामधील १७०० एकर जमिनीवर आणि आसाममधील मोरेगाव जिल्ह्यातील जमिनीवर दावे करण्यात आले. हरयाणातील गुरुद्वाराची जमीन वक्फला सुपूर्द करण्यात आली. प्रयागराजमधील चंद्रशेखर आझाद उद्यानालाही वक्फ घोषित करण्यात आले. तसेच हिमाचल प्रदेशात, वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर मशिदी बांधण्यात आल्या. तामिळनाडूमध्ये, १५०० वर्षे जुन्या मंदिराची जमीन वक्फला देण्यात आली.”
वडणगे येथील मंदिराचा नेमका वाद काय आहे?
येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर 89 मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षांपासून वडणगे ग्रामपंचायत व मुस्लिम समाज यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. एकूण 17 गुंठे जागेत मुस्लिम समाजाची मशीद व काही दुकानगाळे आहेत. 29 एप्रिल 2024 रोजी उपसंचालक भूमिअभिलेख पुणे यांनी या जागेच्या मालकीपत्रात फेरफार करण्याचा आदेश दिल्यानंतर, ऑगस्ट 2024 मध्ये महसूल मंत्रालयात झालेल्या सुनावणीत भूमिअभिलेखच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, वडणगे येथील गट नंबर 89 मधील या जागेसंदर्भात लोकसभेत चर्चा झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. Amit Shah On Waqf Amendment Bill |
हेही वाचा:
“हुबेहूब सीन्स कॉपी”; ‘लापता लेडीज’वर ‘या’ विदेशी चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप; किरण राव ट्रोल





