Amit Shah : संकुचित राजकीय लाभासाठी संसद ठप्प करणे अयोग्य; अमित शाह यांची विरोधकांवर टीका

नवी दिल्ली : संसद आणि विधिमंडळांमध्ये अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. मात्र, विरोधाच्या नावाखाली संकुचित राजकीय लाभ मिळवण्यासाठी कामकाज ठप्प करणे अयोग्य आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. संसदेत मर्यादित स्वरूपाची चर्चा झाल्यास राष्ट्र उभारणीतील योगदान प्रभावित होते.
जनतेशी निगडीत मुद्दे उपस्थित करण्यासाठी निष्पक्ष व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपण कार्य करायला हवे. सभागृहाच्या प्रतिष्ठेशी तडजोड झाल्याचे गंभीर परिणाम होतात, असा इशारा शहा यांनी दिला. ते अखिल भारतीय सभापती परिषदेत बोलत होते. विरोधकांनी नेहमीच संयमी असायला हवे. एकापाठोपाठ एक अधिवेशनांमध्ये कामकाज चालू न देणे हे चांगले लक्षण नव्हे. देशाने, जनतेने आणि लोकप्रतिनिधींनीही त्यावर चिंतन करायला हवे.
सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी निष्पक्षपणे युक्तिवाद करायला हवेत. सभागृहांचे कामकाज नियमांनुसार चालण्याची निश्चिती आपण करायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली. संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने गदारोळ होऊन अधिवेनशातील बरेचसे कामकाज वाया गेले. त्या पार्श्वभूमीवर, शहा यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या.





