परदेशी टी-शर्ट घालून निघाले भारत जोडायला – अमित शहा यांची टीका

जोधपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एकदा संसदेतील भाषणावेळी भारत हा देश नसल्याचे म्हटले होते. आता तेच परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडायला निघाले आहेत, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सोडले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.
त्या यात्रेत इतरांसमवेत पायी चालणाऱ्या राहुल यांना त्यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून भाजप लक्ष्य करत आहे. त्या बरबेरी टी-शर्टची किंमत 41 हजार 257 रुपये असल्याचा दावा भाजपने केला आहे. तोच धागा पकडून शहा यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला.
कॉंग्रेसशासित राजस्थानच्या दौऱ्यावर आलेले शहा येथे भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. कॉंग्रेस विकासासाठी कार्य करू शकत नाही. तो पक्ष केवळ लांगूलचालन आणि मतपेढीचे राजकारण करू शकतो. कॉंग्रेस केवळ राजस्थान आणि छत्तीसगढ या दोन राज्यांमध्येच स्वबळावर सत्तेत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत दोन्ही राज्यांमधील सत्ता गेल्यानंतर कॉंग्रेसच्या हाती काहीच राहणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यातून शहा यांनी राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.





