Sanjay Raut : “भारताला अमेरिका नाचवत आहे, पंतप्रधान मोदींमध्ये हिंमतच नाहीये…”; संजय राऊतांची खोचक टीका
या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज सकाळी राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराण वर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर संतप्त इराणने अमेरिकन आणि इस्रायली ठिकाणांवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केले असून संपूर्ण परिसरात तणाव वाढला आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली Strait of Hormuz सामुद्रधुनी काही काळासाठी बंद केली. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होते. हा मार्ग बंद झाल्याने भारतासह अनेक देशांमध्ये तेल आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या संकटाच्या काळात अमेरिकेने भारतासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारताला रशिया कडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सूट दिली आहे. “भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी भारताला रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची परवानगी देण्यात आली आहे.” या निर्णयामुळे सध्या समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकरमधून भारताला तेल खरेदी करता येणार आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज सकाळी राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, “रशियाकडून तेल घ्यायला आम्हाला अमेरिका परवानगी देत आहे. हा निर्णय भारताचा नाही, तर अमेरिकेचा आहे. परवानगी ही गुलामांना दिली जाते. भारताला अमेरिका नाचवत आहे.” त्यांनी पुढे पंतप्रधानांनी या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
या युद्ध परिस्थितीत ज्याप्रमाणे भारताचं नेतृत्व चूप आहे, याचा अर्थ या युद्धखोर लांडग्याविरुद्ध उभं राहण्याची त्यांच्यामध्ये हिंमतच नाहीये, अशी टीकाही राऊतांनी केली. या युद्धखोर परिस्थितीमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, निर्यातीवर फार बंधनं आली आहेत. शेती उत्पादन, फळ फळावळ, कापड, टेक्स्टाईल यावर बंधनं आली आहेत.
भारत देश को गुलाम बनाने वाले प्रधानमंत्री मोदी को
तुरंत इस्तीफा देना चाहिये!
देश का अपमान
नही सहेगा हिंदुस्थान!@BJP4India @RahulGandhi https://t.co/fYFsYORRP6— Sanjay Raut (@rautsanjay61) March 6, 2026
यावर सरकारकडे याक्षणी कोणतीही भूमिका नाही. काही विद्यार्थी, पर्यचक, काम धंद्यासाठी गेलेले नागरिक, अशी आमची हजारो लोकं ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, यावर काय करणार याबद्दलही सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. परिस्थिती फार गंभीर आहे, असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.
मध्यपूर्वेतील संघर्ष का महत्त्वाचा? Sanjay Raut
मध्यपूर्व हा जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्याचा प्रदेश आहे. स्टेट ऑफ होर्मुज या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल वाहून नेले जाते. त्यामुळे या मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर होतो.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अलीकडील हल्ल्यांनंतर या संघर्षाने अधिक तीव्र रूप धारण केले असून पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेलपुरवठा धोक्यात आला आहे. भारताला तात्पुरता दिलासा देण्यासाठी अमेरिकेने रशियन तेल खरेदीची 30 दिवसांची सूट दिली असली, तरी या निर्णयावरून देशांतर्गत राजकारण तापले असून सरकारवर टीका सुरू झाली आहे.






