Pune Police : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी एका महिलेचा जीव पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात आला. नवीन कात्रज बोगद्याजवळील मुंबई-पुणे-सातारा महामार्गावर उंच डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचे समुपदेशन करून तिला पोलिसांनी सुरक्षित खाली आणले. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर महमार्गालगत असलेल्या सुमारे २०० ते २५० फूट उंच डोंगराच्या कड्यावर संबंधित महिला उभी असून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर पोलिसांनी डोंगराच्या दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी पोहोचत महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र, संयमाने आणि समजूतदारपणे समुपदेशन करत पोलिसांनी तिचे मन वळवले आणि अखेर तिला सुरक्षितपणे खाली आणण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कौटुंबिक कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी येथे आल्याचे सांगितले.