अमरिंदर यांनी तलवार केली म्यान; सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा?

चंडीगढ – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कुठलाही निर्णय सर्वांना मान्य असेल, अशी नरमाईची भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शनिवारी घेतली. त्यामुळे पंजाब कॉंग्रेसमधील कलहात अमरिंदर यांनी तलवार म्यान केल्याचे मानले जात आहे. त्यातून माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
अशात त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये दुही निर्माण झाली आहे. त्याला प्रामुख्याने अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील दुरावा कारणीभूत ठरला आहे. प्रदेश शाखेतील दुही संपवण्यासाठी काही दिवसांपासून कॉंग्रेसश्रेष्ठी सक्रिय झाले. त्यानंतर अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील दरी कमी होत असल्याचे संकेत मिळू लागले. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती मिळणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या.
मात्र, अमरिंदर यांनी शुक्रवारी सोनियांना पाठवलेल्या पत्रामुळे सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले. त्या पत्रातून अमरिंदर यांनी सिद्धू यांना बढती देण्यास विरोध दर्शवला. पक्षातील जुन्या जाणत्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
अमरिंदर यांच्या पत्रामुळे पंजाब कॉंग्रेसमधील पेच इतक्यात संपुष्टात येणार नसल्याचे सूचित झाले. त्या पत्रानंतर कॉंग्रेसचे प्रभारी हरीष रावत यांनी लगबगीने पंजाब गाठत अमरिंदर यांची भेट घेतली.
त्यानंतर अमरिंदर यांनी बरीचशी नरमाईची भूमिका घेतली. मात्र, त्यांनी सिद्धू यांच्या बढतीला हिरवा कंदील दाखवण्यासाठी काही अटीही घातल्याचे समजते. सिद्धू यांनी याआधी अमरिंदर यांच्यावर जाहीरपणे टीकाटिप्पणी केली. त्याबद्दल सिद्धू यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची अटही घातल्याचे समजते.





