परमार्थ : लपलेलं सुख

– अरुण गोखले
जीवनातला हा एक सुख दु:खाचा खेळ आहे. तो सुख दु:खाचा खेळ कसा ओळखायचा. तो विवेकाने कसा खेळायचा ही जीवनकला जर आपल्याला माहीत करून घ्यायची असेल, ती शिकायची असेल तर त्यासाठी आपल्याला साधू, संत, सत्पुरूष आणि सद्गुरू यांच्या पाशीच जावे लागते.त्यांची शिकवण, त्यांचा बोध, त्यांनी दिलेली ज्ञानदृष्टी हीच आपल्याला सुखातलं दु:ख आणि दुःखातले सुख कसे शोधायच? आणि आपल्या मनाची शांती कशी अखंडित राखायची हे शिकवून जाते.
त्यांच्या कृपेनेच सुखातले दु:ख म्हणजे आपल्या उशाशी असलेले धनाचे आपलेच गाठोडे हे ते धन कोणीतरी चोरून नेईल या काळजी आणि चिंतेने आपली सुखाची झोप उडते. किमती गाद्यावर लोळतानाही सुख निद्रेसाठी डोळ्यात पाणी का आणावे लागते, झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात, ते आपल्याला समजावून देतात, सांगतात, शिकवतात.
तसेच दु:खाच्या डोंगरातून वाहणारा सुखाचा झरा कसा शोधायचा, त्याचे समाधानाचे पाणी पिऊन कशी तृप्तीची ढेकर द्यायची हे त्यांच्याकडूनच शिकावे लागते. ते आपल्याला सांगतात की बाबारे, दु:खातही सुख कसं लपलेलं आहे हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर ते बाळासाठी नऊ महिने कष्ट, यातना, क्लेष, याचे दु:ख भोगणार्या आणि बाळाच्या जन्माने सुखावणार्या मातेला विचारा.
जेव्हा एखादा शेतकरी हा आपले फुललेले, मस्तपणे वार्यावर डुलणारे शिवार पाहतो तेव्हा त्याला ते पाहून त्याने आजवर वेचलेल्या कष्टाचा, मेहनतीचा विसर पडतो आणि त्याला कसा आणि कोणत्या समाधानाचा आनंद होतो, ते त्याला विचारा. एखाद्या मोलकरणीची मुलगी अधिकारी होते तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी जे कष्ट, जी उपासमार सहन केलेली असते, स्वत:च्या हौस मौजेला जी मुरड घातलेली असते त्याचे ते दु:खाश्रू आनंदाश्रू असतात का ते त्यांचे श्रम साफल्याचे सुखा-समाधाचे अश्रू असतात, ते त्यांनाच विचारावे.
आपल्याला ही जीवनकला शिकवणार्या त्या लोकांना हेच शिकवायचे असते की सुख आणि दुःख हे जीवनात असणारच आहे. ते भोगत असतानाही आपलं अंतरिक समाधान, शांती आणि आनंद हा कायम कसा टिकवायचा हीच जगण्याची जीवनकला आहे.





