ईदच्या दिवशीदेखील जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक; नमाज पठाणानंतर रस्त्यावर उतरत आंदोलकांचा गोंधळ

श्रीनगर : देशभरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मात्र तिकडे जम्मू काश्मीरमध्ये आजच्या पवित्र दिवशीदेखील राज्यात काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग मध्ये स्थित एका मशिदीसमोर तैनात असलेल्या जवानांवर दगडफेक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ईदच्या नमाजानंतर जवानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
काही लोक नमाजनंतर अचानक रस्त्यावर आले, त्यानंतर काश्मीरच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. यातीलच काही जणांनी जवानांवर दगडफेक केली. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल लाठीचार्ज केला तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा देखील वापर करण्यात आला.
या दगडफेकीनंतर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.




