G-20 परिषद होत असलेला “भारत मंडपम’ 123 एकरमध्ये पसरलाय, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या सर्वकाही

G-20 शिखर परिषद: देशाची राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषद आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सदस्य देशांसह 29 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी भारतात आले आहेत. G-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीचे छावणीत रूपांतर झाले आहे. प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम एकूण 123 एकरमध्ये पसरलेला आहे. ते ऑस्ट्रेलियाच्या सिडनी ऑपेरा हाऊसपेक्षा मोठे आहे. भारत मंडपम बद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती…
40 लाख स्क्वेअर फुट जागेत बांधकाम, 13 हजार लोक बसण्याची क्षमता –
भारत मंडपमचे शिल्पकार संजय सिंह आहेत. हा प्रकल्प आरकाॅप असोसिएट्स कंपनीने सिंगापूरच्या एडासच्या सहकार्याने तयार केला आहे. भारत मंडपमच्या सजावटीत प्रत्येक राज्यातील कलाकृतींचा वापर करण्यात आला आहे. समिट हॉलमध्ये लावण्यात आलेले झुंबर चेक रिपब्लिकमधून आयात करण्यात आला आहे. भारत मंडपम 40 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधला आहे. हा प्रकल्प 2016 मध्ये सुरू झाला. भारत मंडपम जुलै 2023 मध्ये बांधून पूर्ण झाले. ते बनवण्यासाठी 2,700 कोटी रुपये खर्च झाले आहेत. भारत मंडपममधील फूड हॉल आणि मीटिंग रूम 10 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्याचे प्रदर्शन क्षेत्र 16 लाख चौरस फूट पसरलेले आहे. भारत मंडपम कॉम्प्लेक्समध्ये 13 हजार लोकांच्या आसनक्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग परिसरात एकाच वेळी 5 हजार वाहने उभी करण्याची सोय आहे.
7 वर्षात 6 हजार मजुरांनी भारत मंडप तयार केला –
वास्तुविशारद संजय सिंह यांनी सांगितले की, भारत सरकारने आम्हाला हा प्रकल्प ऑक्टोबर 2016 मध्ये बांधण्यासाठी दिला होता. अनेक रचना तयार केल्या. इमारत आधुनिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतातील प्रत्येक गोष्ट त्यात चित्रित करण्यात आली आहे. शासनाकडून मंजुरी घेतल्यानंतर या कामाला सुरुवात झाली. ते पुढे म्हणाले की, दोन्ही कंपन्यांमधील 200 वास्तुविशारद, सल्लागार, अभियंते, तंत्रज्ञ आणि डिझायनर यांनी एकत्र काम केले आणि सुमारे 6 हजार मजूर ते तयार करण्यात गुंतले होते. शापूरजी पालोनजी ग्रुपला बांधकाम मिळाले. कोविडच्या काळातही भारत मंडपमचे काम थांबलेले नाही. आम्ही ऑनलाइन बैठका घ्यायचो. भारत मंडपम जुलै 2023 मध्ये तयार झाले आहे.
भारत मंडपममध्ये आहेत 5 मजले –
भारत मंडपम ही 5 मजली अंडाकृती इमारत आहे. पहिल्या मजल्यावर पीएम लाउंज आणि मीटिंग रूम बनवण्यात आली आहे. या मजल्यावर पीएम लाउंज, द्विपक्षीय लाउंज आणि मीटिंग रूम देखील आहे. बैठकीच्या खोलीची क्षमता 600 लोक आहे. त्यात 50 आणि 100 लोकांची क्षमता असलेला बैठक कक्षही बनवण्यात आला आहे. दुसरा मजला व्हीव्हीआयपी मानकांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. याच मजल्यावर जी-20 बैठक आयोजित केली जात आहे. येथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. याशिवाय या मजल्यावर दोन सभागृह आणि लीडर्स लाउंज आहेत. एका सभागृहात 600 लोक बसू शकतात आणि दुसऱ्या सभागृहात 900 लोक बसू शकतात.
जगातील सर्वात मोठा इनडोअर हॉल –
भारत मंडपमच्या तिसऱ्या मजल्यावर जगातील सर्वात मोठा इनडोअर हॉल बांधण्यात आला आहे. सभागृहात अंदाजे 7000 लोक एकत्र बसू शकतात. या सभागृहात 6 एलईडी स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत. या मजल्यावरून राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दिसतात. पाचव्या आणि शेवटच्या मजल्यावर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांसाठी जागा तयार करण्यात आली आहे. भारत मंडपमागील इमारतीत स्वयंपाकघर आहे. यामध्ये एकावेळी 10 हजार लोकांसाठी जेवण बनवता येईल. भारत मंडपमच्या आतील भागात प्रत्येक राज्यातील कलाकृती वापरण्यात आल्या आहेत. भारत मंडपममध्ये काश्मीर आणि भदोहीचे गालिचे बसवण्यात आले आहेत.
कलाकृतींवर 15 कोटी रुपये खर्च केले –
भारत मंडपमच्या कलाकृतीवर 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भारत मंडपमच्या कलाकृतीचे काम 2018 मध्ये सुरू झाले. ते पूर्ण व्हायला तीन वर्षे लागली. त्यात भारतीय संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. भारत मंडपम बाहेरील उद्यानात शंखाचा आकार तयार करण्यात आला आहे. भारतीय परंपरांमध्ये असे मानले जाते की शंख हे पृथ्वीवरील पाणी आणि जीवनाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.





